Showing posts with label Marathi books. Show all posts
Showing posts with label Marathi books. Show all posts

Tuesday, January 31, 2023

महाश्वेता

 

"महाश्वेता"

सुधा मूर्ती 

अनुवाद उमा कुलकर्णी 




हाश्वेता ही सुधा मूर्ती ह्यांनी लिहलेली एक प्रेरणादायी कादंबरी आहे. अंगावर कोडाचा डाग उमटणे म्हणजे जीवनाचा अंत मानणाऱ्या समाजात जेव्हा एखाद्या स्त्री च्या अंगावर असाच एक पांढरा डाग येतो, तेव्हा तो तिच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण घराण्यासाठी शाप बनतो. ही कादंबरी अशाच एका कोड फुटलेल्या नायिकेची कथा सांगते. चर्मरोगाने ग्रासलेली नायिका समाजाच्या ओझ्याखाली कोलमडते की धैर्याने तोंड देते, हे जाणून घ्यायची उत्कंठा वाचकांमध्ये शेवट पर्यंत निर्माण करण्यात लेखिका सुधा मूर्ती यशस्वी ठरतात. लेखिकेच्या प्रगल्भ विचार आणि आधुनिक जीवनाशी समन्वय साधणाऱ्या दृष्टीमुळे, या कथेला एक अलौकिक गहनता प्राप्त झाली आहे. म्हणूनच, पुस्तकाचा शेवट प्रत्येक वाचकास विचार करण्यास प्रवृत्त करतो.

कथेची नायिका अनुपमा ही नावाप्रमाणेच अद्वितीय सौंदर्यवती होती. अनुपमेची आई लहानपणीच वारली होती तर, तिचे वडील गावच्या शाळेमध्ये शिक्षक होते. तिची सावत्र आई तिचा मत्सर करी. घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा बेताचीच होती. नाटकाची अनुपमाला विशेष आवड होती. तिने कॉलेजमध्ये बऱ्याच नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या होत्या. अशाच एका नाटकाच्या प्रयोगामध्ये डॉक्टर आनंद तिला पाहतो आणि सौंदर्योपासक आनंद पाहताक्षणी तिच्या सौंदर्यावर भुलतो. आनंद हा श्रीमंत घरातील देखणा मुलगा असतो. अनुपमाला पाहताक्षणी ह्याच मुलीशी लग्न करायचे, हे तो पक्के करतो. आनंदची आई, राधाक्कांना हे लग्न अजिबात मान्य नसते. केवळ आनंद आणि समाजाच्या समोर मोठेपणा दाखवण्यासाठी त्या मनाविरुद्व जाऊन अनुपमा आणि आनंदच्या लग्नाला परवानगी देतात.

लग्नानंतर काही दिवसांतच आनंद पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला निघून जातो. श्रीमंतीचा गर्व असणारी सासू आणि पैश्याच्या जोरावर बेताल वागणारी नणंद गिरीजा, ह्यांच्या सोबत अनुपमा एकटीच अडकते. अशातच एकदिवस निखारा पाडण्याचे निमित्त होऊन तिच्या पायावर एक पांढरा डाग उमटतो. तो डाग कोडाचा आहे, हे जेव्हा अनुपमाला समजते, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. राधाक्कांना हे समजताच, अनुपमाने आणि तिच्या वडिलांनी त्यांची फसवणूक केली, असे आरोप करून त्या अनुपमाला माहेरी पाठवतात. माहेरीसुद्धा अनुपमेला अपमानास्पद आणि हीन वागणूक मिळते. यासर्वांतून आनंदच आपली सुटका करू शकेल या आशाने ती आनंदला अनेक पत्र लिहिते आणि त्याच्या उत्तराची ती चातकासारखी वाट बघते. पण आनंद चे उत्तर कधीच येत नाही. कोड घालवण्यासाठी अनेक उपास, औषधे चालू होती, पण कशालाच यश मिळत नव्हते. अशातच तिच्या कोडामुळे तिच्या सावत्र बहिणींची लग्न मोडू लागली. वाढत जाणारे कोड, सावत्र आई आणि बहिणीकडून मिळणारी तुच्छ वागणूक, सामाजिक-आर्थिक ओझ्यामुळे खचलेले वडील आणि नवऱ्याने नाकारल्याची भावना, ह्या सर्वांमुळे अनुपमा पुरती कोलमडून गेली होती. 

नेहमीप्रमाणे अनुपमा देवीच्या टेकडीवर पूजेसाठी  गेली असता, आनंदच्या भारतात परतण्याच्या आणि गिरिजाच्या लग्नाच्या गोष्टी तिच्या कानावर पडतात. एवढेच नव्हे तर आनंद सुद्धा पुन्हा लग्न करणार असे समजते. अनुपमाला मोठा धक्का बसतो. टेकाडावरून उडी मारून जीव देऊन ह्या त्रासातून कायमची सुटका मिळवण्याचा क्षणिक मोह तिला होतो. आपल्या आत्महत्येमुळे कुणालाही फारसे वाईट वाटणार नाही, तर काही काळ लोकांच्या दयेचा धनी होऊन भूतकाळात विलीन होऊ,असा विचार तिच्या मनाला चटका लावून जातो. अनुपवरच्या प्रेमाच्या एवढ्या गप्पा मारणाऱ्या आनंदने ती जीवंत आहे की नाही हे बघायला पण फिरकू नये आणि स्वतः डॉक्टर असूनही कोडासारखा रोग अनुवांशिक नाही एवढे सुद्धा आईला सांगण्याचे धैर्य दाखवू नये, ह्याचा अनुपमाला तिरस्कार वाटतो. रुप आणि पैश्याच्या जोरावर गिरीजा स्वतःची चारित्र्यहीनता लपवून समाजासमोर ताठ मानेने जगू शकत होती, याउलट एका पांढऱ्या डागामुळे आपले सद्गुण मातीमोल ठरले, याचा अनुपमाला संताप येतो. आणि तिचे मरणोन्मुख मन पुन्हा चेतनामय दिशेने झेपावू लागते. ती स्वतःच्या मनाशी निश्चय करते आणि टेकडीवरून खाली उतरते. 

आत्महत्येचा विचार झटकून अनुपमा थेट मुंबई गाठते आणि तिथे तिच्या कॉलेजच्या मैत्रिणीच्या घरी राहू लागते. लवकरच ती तिथे एक जॉब शोधते आणि आर्थिक स्वावलंबाच्या दिशेने पहिले पाऊल टाकते. पण एका स्त्रीचे जीवन एवढे सरळ सोप्पे कुठे असते? अनुपमाच्या मैत्रिणीचा नवरा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. ती तिथून कशीबशी निसटते आणि त्वरित स्वतःची दुसरीकडे राहायची व्यवस्था बघू लागते. डॉली, तिची नोकरीतील सहकारी तिच्या मदतीला येते आणि ती अनुपमाची स्वतःच्या घरी राहण्याची सोय करते. लवकरच अनुपमाला मुंबईच्या एका कॉलेज मध्ये संस्कृत शिक्षिकेची नोकरी मिळते आणि ती पुन्हा संस्कृत नाटकाच्या दुनियेत प्रवेश करते.

एकेदिवशी दुर्देवाने अनुपमाचा अपघात होतो. तिला जवळच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले जाते. तिथे तिची डॉक्टर वसंत आणि त्यांचा मित्र डॉक्टर सत्या सोबत ओळख होते. एकाच प्रांतातील, समभाषिक असल्यामुळे पेशंट आणि डॉक्टरच्या नात्यापलीकडे डॉक्टर वसंत आणि अनुपमाची मैत्री होते. अनुपमाप्रमाणेच वसंतचे विचार सुद्धा अत्यंत आदर्श होते. स्वतः अनाथ असल्यामुळे, डॉक्टर बनून गावी जाऊन गरिबांची सेवा करण्याचे स्वप्न वसंतने उरी बाळगले होते. वसंतला संस्कृत नाटकांचे वेड असल्यामुळे अनुपमा आणि वसंत ह्यांमधे वैचारिक देवाणघेवाण सुरु होते. पुढे सत्याला जेव्हा टायफाईड होतो आणि मेसच्या खाण्याऐवजी घरच्या खाण्याची गरज असते, तेव्हा अनुपमा स्वतःहून सत्याची स्वतःच्या घरी राहण्याची सोय करते आणि त्याची सेवा करते. सत्याला त्याच्या प्रेमभंगाचे दुःख अनावर वाटत होते तेव्हा अनुपम स्वतःच्या कटू भूतकाळाविषयी आणि तिच्या संघर्षाविषयी सांगते. हे जेव्हा वसंतला समजते तेव्हा अनुपमाविषयी त्याला अधिकच जिव्हाळा आणि आपुलकी वाटू लागते. वसंतला कोडाने ग्रासलेली 'महाश्वेता' अनुपमा कधी दिसलीच नाही, उलट बुद्धिवान, धारिष्ट्यवान आणि मन व हृदयाच्या दृष्टीने आगर्भ श्रीमंत असलेली अनुपमा दिसली. हिच आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी साथ देऊ शकेल, हे त्याच्या मनाने पक्के ओळखले. आणि एकदिवस वसंत अनुपमाला लग्नाची मागणी घालतो.

दुसरीकडे आनंदला दिवसेंदिवस आयुष्यातील अनुपमाची कमी प्रकर्षणाने जाणवू लागते. राधाक्कांच्या त्याच्या  लग्नाच्या सर्व प्रयत्नांना तो नाकारत होता. त्यातच त्याला गिरिजाच्या भूतकाळाचे सत्य समजते. वीज चमकल्या प्रमाणे आनंदच्या डोक्यात प्रकाश पडतो. अनुपमाचे सौंदर्य पांढऱ्या डागाने डागळेल म्हणून समाजच्या भीतीपोटी आपण अनुपमला दूर केले आणि आपल्याच घरी गिरीजचा स्वैराचार सोयीस्करपणे लपवला ह्याची तीव्र जाणीव आनंदला होते. आनंदला आपली चूक आता पुरती लक्षात येते आणि तो अनुपमला शोधण्यासाठी निघतो. बऱ्याच शोधाशोधीनंतर अनुपमा ह्या जगातच नसल्याचे आनंदला समजते, आणि हताश मनाने तो त्याचे शोधकार्य थांबवतो. परंतु नियतीच्या मनामध्ये दुसरेच असते. मुंबईला एका कॉन्फरन्सच्या निम्मिताने आला असता संस्कृत नाटकाच्या प्रयोगामध्ये आनंदला अनुपमा दिसते. तो अनुपमाला गाठतो आणि माफी मागतो. एवढेच नव्हे तर तिच्या सोबत नव्याने आयुष्य सुरु करण्याची इच्छा व्यक्त करतो. 

अनुपमाचा आनंदकडे परत जाण्याचा प्रश्नच नव्हता. होरपळून गेलेल्या बीजाला पुन्हा कोंब फुटणे अशक्य होते. अनुपमाला प्रेम, नवरा, माया हे सारे निरर्थक वाटत होते. त्यामुळे तिने आनंदला थेट नकार दिला. पण वसंत, ज्याने अनुपमला ती आहे तशी स्विकारण्याची इच्छा व्यक्त केली, त्याला उत्तर देणे अनुपमासाठी कठीण होते. तिने त्यासाठी विचार करण्याचा वेळ मागितला. अनुपमाचा नात्यांवरचा विश्वास पूर्ण उडाला होता. मुंबईच तिला स्वतःचे घर वाटत होते. तिला पुन्हा गावाच्या लोकांच्या तिरस्काराच्या नजरा आणि उसनी दया नको होती. म्हणून ती वसंतला सुद्धा नकार देते. पण त्याच्या समाजसेवेसाठी लागेल ती मदत करण्याचे वचन देते.

अनुपमाचा हा निर्णय काही वाचकांना चटका देऊन जातो. परंतु एक स्त्री म्हणून मला तिचा निर्णय अत्यंत योग्य वाटतो. एक स्त्री स्वतःसाठी स्वयंपूर्ण असते. परंतु तिला प्रेमाची आणि भावनिक आधाराची गरज असतेच. जेव्हा ती कटू दुनियेत होरपळून आत्मनिर्भर बनते, तेव्हा ही गरज पण संपून जाते. ती स्त्री समर्थ बनते; बंडखोर नाही. आगीतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्या प्रमाणे अनुपमासुद्धा स्वतःच्या आयुष्याला आकार देण्याइतकी सक्षम होते. तेव्हा प्रेमाची भूक संपून, फक्त स्वप्नांची ओढ लागते. ह्या समाजात अनेक अनुपमा चालीरितींचा वेढ्यामध्ये घुसमटत आहेत, त्यांना मोकळा श्वास घेण्याची आशा लेखिका सुद्धा मूर्ती ह्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांच्या ह्या प्रयत्नाला माझा सलाम.


Wednesday, December 29, 2021

Anudini

श्रीयुत गंगाधर टिपरे 

अर्थात 

"अनुदिनी"

दिलीप प्रभावळकर 

हानपणी आम्ही सगळे कुटुंब मिळून "श्रीयुत गंगाधर टिपरे " हि मालिका खूप आवडीने आणि न चुकता बघायचो. अगदी आज्जी -बाबांपासून  (आजोबा) ते माझ्या पर्यंत सर्वांचीच ती मालिका लाडकी होती. दिलीप प्रभावळकर, ज्यांनी मालिकेत प्रमुख भूमिका केली आहे, त्यांच्या "अनुदिनी" ह्या पुस्तकावर आधारित हि टिव्ही मालिका आहे, हे समजल्यापासूनच ते पुस्तक वाचायची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. आणि finally तो योग आला. नियमित अनुदिनी म्हणजे Diary लिहिणारा कोणी म्हणजे great च. परंतु, लेखकांनी एक नव्हे तर संपूर्ण कुटुंब रोज अनुदिनी लिहिते,अशी कल्पना करून सभोवतालच्या हलक्या फुलक्या प्रसंगांचे खुसखुशीत आणि विनोदी वर्णन केले आहे. भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आसपासच्या दुनियेत घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक प्रसंगांचे आणि उलथापालथीचे हे मध्यमवर्गीय कुटुंबातील पाच जण साक्षीदार आहेत आणि या  कुटुंबातील तीन पिढ्यांतील माणसे एकाच घटनेकडे कशी बघत असतील, याची  कल्पना करून, त्यांचा दृष्टीकोन कधी मिश्किल पणे, तर कधी गंभीरपणे लेखकांनी पुस्तकातून मांडला आहे. 

टिपरे कुटुंबातील सदस्यांची रोज diary लिहणे ही common  सवय सोडता, बाकी सर्वच भिन्न आहे. शेखर टिपरे, टिपऱ्यांचे कुटुंबप्रमुख,मुंबईतील टिपिकल कॉमन मॅन च्या व्याख्येत तंतोतंत बसतात. साहित्य,नाट्य,संगीत वैगरे गोष्टींमध्ये ह्यांना विशेष रस होता. दरवर्षी ते resolution करत की त्यांच्या ह्या आवडींसाठी खास वेळ काढायचा,पण ऑफिस -घर ह्या चाकोरीत त्यांना ते कधीच जमत नसे. शेखर टिपऱ्यांना चिडचिड करण्यासाठी एरवी काही कारण लागत नसे, परंतु, राजकार-समाजकारण हे त्यांच्या तापाचे खास विषय. आपल्या मुलांसाठी आपण एक मार्गदर्शक, मित्र आणि तत्वज्ञ वैगरे असावे असे त्यांना वाटायचे. परंतु, मुलांचे काळानुसार बदललेले आदर्श आणि तऱ्हेवाईक क्रेझ ह्यामुळे ते शक्य नव्हते याची जाणीव त्यांना ही होती.आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि मार्गी लागावे अशी चारचौघांच्या बापाची असते, तशीच श्री टिपऱ्यांची पण इच्छा होती. आपण त्यांच्या वयाचे असताना आपल्या करिअरच्या माफक आणि टिपिकल अपेक्षा आणि आपल्या मुलांची  क्रिकेटर वा ऍक्टर बनायची स्वप्ने यातील विसंगती त्यांना प्रकर्षणाने जाणवे आणि त्यामुळे त्यांचे मन नेहमी अस्वस्थ होई. 
शेखर टिपऱ्यांप्रमाणेच त्यांच्या पत्नी म्हणजे श्यामला टिपरे ह्यांना पण मुलांच्या भवितव्याची सतत चिंता असे. खरेतर सौ टिपरे सतत कोणत्या ना कोणत्या तरी काळजीत असत.त्या दिवसभर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये गुरफटलेल्या असे, त्यामुळे करियर करणाऱ्या कर्तृत्ववान बायकांचा त्यांना नेहमी हेवा वाटे. आपणही पैसे मिळवले पाहिजे असे त्यांना नेहमी वाटे. म्हणूनच कधी पाळणाघरात सेविका तर कधी खाजगी शिकवणी असे कुठे ना कुठे तरी चिकटायची त्यांची खटपट चालू असे. नाकाच्या problem मुळे गर्ल्स हायस्कुलच्या शिक्षकेची नोकरी सोडून आपण गृहिणी झाल्यापासून घरातल्यांनी आपल्यला गृहीत धरले आहे, अशी खंत त्यांना नेहमी वाटे. राजकारण, क्रिकेट वैगरे विषयात त्यांना काही रस नव्हता पण, जेवताना ह्यावर चाललेली चर्चा त्या न कंटाळता ऐकत. बालमैत्रिणींची भेट किंवा नंदेने अमेरिकेहून आठवणीने आणलेल्या भेटवस्तू ह्या सारख्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये त्या आनंद शोधत. आपली मुले,सासरे आणि पती हेच सौ टिपऱ्यांचे छोटेसे जग होते. 
सौ व श्री टिपरे जितके सरळ आणि एकमार्गी होते, त्या उलट त्यांची दोन्ही मुले बिनधास्त व चंगळवादी होती. मोठा मुलगा श्रीशैल उर्फ शिऱ्या, ह्याचे ग्रॅड्युएशन झाले होते. त्याच्या नोकरीची चिंता ही त्याला सोडून कुटुंबातील बाकी सर्वांना होती. क्रिकेट वर त्याचे विशेष प्रेम होते. एक तर क्रिकेटर बनायचे किंवा क्रिकेट ची टीम असलेल्या कंपनी मधेच नोकरी करायची, असे त्याचे स्वप्न होते. भारताने क्रिकेट ची मॅच हरली की, शिऱ्याचा mood off  झालाच म्हणून समजा. आणि तो राग नेहमी जेवणावर निघे. क्रिकेट बरोबरच श्रीशैल टिपऱ्यांना 'डिटेक्टिवगिरी' ची आवड होती. परंतु हे hidden talent दाखवायला त्याला आते बहिणीच्या अफेयरची माहिती काढणे  किंवा हरवलेली मांजर 
वैगरे शोधणे, अशी बारीक-सारीक कामेच मिळत. एकदिवस आपण मोठे डिटेक्टिव्ह बनू, अशी त्याला अशा होती. तर दुसरीकडे, शिऱ्याच्या बहिणीला, शलाकाला ऍक्टर बनायचे होते. कॉलेजचे lectures करण्यापेक्षा, मार्क्स कमी पडल्यावर आईवडिलांचे lecture ऐकणे तिला जास्त सोयीचे वाटे. मित्र-मैत्रिणीं बरोबर बर्थडे पार्टी करणे,सहलीला जाणे, विविध beauty treatment करणे वैगरे गोष्टींमध्ये टिपऱ्यांचे हे शेंडेफळ व्यस्त असे. मधूनच शलाका health consciousness च खूळ डोक्यात घेई तर, कधी  photo shoot चे. ऋतू बदलावा तसे तिचे mood बदलायचे. 

शिऱ्या आणि शलाकाचा वात्रटपणा पाठीशी घालणारी व्यक्ती म्हणजे त्यांचे आजोबा, गंगाधर टिपरे. Senior टिपऱ्यांना सर्वजण "आबा" म्हणायचे.आबांचे वय जरी ८० असले तरी, त्यांची energy ही एका तरुणाला लाजवेल अशी होती. ते खूपच fitness freak होते. त्यांचा रोजचा व्यायाम कधी चुकायचा नाही. स्वतःच्या तब्येतीला ते फारच जपत. आपली घरात मदत व्हावी म्हणून ते छोटी मोठी कामे करू पाहत, पण नेमके काहीतरी उलटे होत आणि double कामे त्यांच्या सुनेला लागत. आबांना राजकारण ,क्रिकेट, संगीत आणि चित्रपट वैगरे विषयात गाढे ज्ञान आणि आवड पण होती. या विषयावर स्वतःची मते ते परखडपणे मांडत. आबांनी स्वातंत्र्यपूर्वीचा आणि स्वतंत्र्यानंतरचा भारत,दोन्ही पहिले आहेत. भारताला स्वतंत्र मिळाले तेव्हा आपला उत्साह आणि रोमांच, ५० वर्षांनी कुठेतरी लोप पावला आहे, असे त्यांना सोसायटीच्या सुवर्णमोहत्सवी कार्येक्रमामध्ये वाटते.  नवीन पिढीच्या स्वछंदी वागण्याला त्यांची कधी ना नव्हती, परंतु या पिढीची वास्तव आणि आदर्श ह्यात गफलत होते असे त्यांचे मत होते. त्यांची नात, योगिता हिचे trial marriage वैगरे भानगडी आबांच्या कल्पनेच्या पलीकडील होत्या. तरीही ही गोष्ट त्यांनी संयमाने accept केली.आपले घरचे आपली काळजी घेतात,सेवा करतात आणि घरच्या सगळ्यांना आपण हवेसे वाटतो, याची सुखद जाणीव आबांना होती. नातवंडे, सून-मुलगा ह्यांच्या सोबत ते खुश होते पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात, पावलोपावली आपल्या सहचारणीची कमी त्यांना जाणवत असे. 

टीव्ही वरील क्रिकेट एकत्र पाहणे, लतादीदीचे कॉन्सर्ट श्रद्धाळूपणे ऐकणे, सोसायटीमध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी होणे हीच टिपऱ्यांची सुखाची कल्पना. देशाच्या भविष्यावर चिंता करणे, राजकारण्यांचा तीळतीळ करणे आणि सगळे विसरून दुसऱ्यादिवशी पुन्हा आपले धकाधकीचे routine पाळणे हे रोजचेच होते. मराठी मध्यमवर्गाचे हे असे हताशपणे सुख शोधणे आणि कोणत्याही आदर्शाशिवाय केवळ जगण्यामागे फरपटने हे लेखकाच्या विनोदी लेखनातून फार गंभीरपणे आले आहे. 

टिपरे कुटुंबाच्या रोजनिशीतील पाने वाचताना प्रत्येक मराठी वाचकाला deja vu झाल्याशिवाय राहत नाही. पुस्तक वाचताना आपण कोणत्या ना कोणत्या पात्राशी स्वतःला relate करू पाहतो. आबा,शिऱ्या ,शलाका ,श्यामला आणि शेखर ह्यांच्या डायऱ्या वाचून आपल्याला सर्वजण आपलेसे वाटू लागतात आणि त्यांच्यावर लोभ जडतो. 


पुस्तक विकत घेण्याची लिंक -Anudini




Tuesday, June 22, 2021

Vyakti Aani Valli

 व्यक्ती आणि वल्ली 

पु. ल . देशपांडे 


       युष्यात आपण बऱ्याच लोकांना भेटतो.काही व्यक्ती काळानुसार विस्मरणात जातात तर काही लोक मात्र त्यांच्या स्वभावामुळे 'चांगलेच' लक्षात राहतात."व्यक्ती तितक्या प्रकृती" नुसार व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो.परंतु तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरून त्याला विनोदाची खुशखुशीत फोडणी देऊन,साऱ्या महाराष्ट्राला खळखळून हसवण्याची कसब फक्त एकाच व्यक्तीने साधली ती म्हणजे पु ल देशपांडे नी! १९४३ साली अभिरुची मासिकाच्या एका अंकामध्ये 'अण्णा वडगावकर' हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले आणि ते मराठी वाचकांच्या प्रचंड पसंतीस आले. नंतर १९६३ पर्यंत प्रसिद्ध झालेली एकूण २० व्यक्तिचित्रे 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकाच्या माध्यमातून संग्रहित झाली.आज कित्येक दशके उलटूनही हा संग्रह मराठी वाचकांचे मनोरंजन करत आहे आणि करत राहील ह्यात दुमत नाही.व्यक्ती आणि वल्ली वाचताना प्रत्येक पात्राचे पुलं नी केलेले चोखंदळ वर्णन वाचल्यावर ही व्यक्ती आपल्याला कधीतरी भेटली आहे किंवा आपल्यातीलच एक आहे अशी भावना आल्याखेरीज राहत नाही.आणि मग प्रत्येकामध्ये एक 'वल्ली' लपलेला असतो तो फक्त टिपता आला पाहिजे हे पुलं च वाक्य शंभर टक्के पटते. अश्याच वीस वल्लींपैकी मला आवडलेली काही पात्रे :
नारायण- नारायण हा एक असा नमुना आहे की,प्रत्येकाचा कुठून ना कुठून तरी नाते लागणारा नातलग.कुठल्याही मंगलकार्याला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला. घरात कार्य निघाले की जो वेळेवर टपकतो (कधी-कधी आगंतुक) तो म्हणजे नारायण.लग्नाचीच गोष्ट घेतली तर मुलगी बघण्याच्या कार्यक्रमापासूनच नारायण हजर असायचा,ते मुलगीची वरात मांडवातून निघूपर्यंत त्याची धावपळ चालूच असायची.त्यामुळे प्रत्येक कामामध्ये नारायण हवाच, असा घरच्या प्रत्येकाचा आग्रह असायचा. महिलावर्गाची साडी खरेदी हा पुरुषांचा सर्वात नावडता भाग परंतु, नारायण मात्र त्यात सुद्धा हिरीरीने सहभाग घ्यायचा. अशाप्रकारे एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये निस्वार्थपणे राबणारा नारायण आत्ताच्या 'दार-बंद ' आणि 'narrow minded'  संस्कृतीमध्ये मिळणे अशक्य आहे. 
हरितात्या-  हरितात्या जगण्यासाठी  नेमका काय उद्योग करायचे हे कोणालाच माहित नव्हते. त्यांनी एक व्यवसाय कधी धड केला नाही. इतिहासातील प्रसंगांचे वर्णन हरितात्या असे काही करायचे की, शिवाजीमहाराज,रामदास किंवा तुकाराम हे त्यांचे बालमित्रच असावे. प्रत्येक प्रसंगामध्ये ते कुठे ना कुठे तरी स्वतःला गोवायचेच. मग, भले ती पावनखिंडाची लढाई असो किंवा रामदासांच्या बालपणीची एखादी गोष्ट. 'पुराव्याने शाबीत करीन' ही त्यांची ठरलेली catch phrase. इतिहासासारखा क्लीष्ट विषय हरितात्या इतका जिवंत करून सांगायचे की, ऐकणाऱ्याला तो आवडायला लागे. हरितात्यानी लहानपणी कधीच लेखकांना एक पैशाचा खाऊ दिला नाही, पण आपल्या इतिहासावरचा सार्थ अभिमान दिला.वार्धक्याने हरीतात्या गेले आणि त्यांच्यासोबतच 'पुराव्याने शाबीत करेन' हे वाक्यसुद्धा इतिहासजमा झाले. 
सखाराम गटणे -काही लोक असतात जे कमालीचं शुद्ध आणि छापील बोलतात. ते बोलतात तेव्हा असे वाटते की बालभारती मधला एखादा धडाच वाचून दाखवत आहेत. सखाराम गटणे हा या category चा संस्थापक असावा. लेखकांची आणि गटणे ची ओळख एका व्याख्यानानंतर सही घेण्याच्या निमित्ताने झाली. आणि गटणेच्या अति शुद्ध बोली मुळे स्वतः साहित्यिक असूनही लेखक थक्क झाले.'अनुज्ञा', 'मार्गदर्शन', 'जीवनानुभूती', 'साकल्याने मिळणारे समाधान' असल्या छापील शब्दांची अडगळ गटण्याच्या तोंडात नेहमी साठलेली असे. पेंटर बापाच्या घरी गटणे सारखी 'व्यासंगी' औलाद कशी काय उपजली हे लेखकांसाठी एक कोडेच होते. साहित्याशी एकनिष्ठ राहण्याचा विडा सख्याने उचलला होता आणि म्हणून तो लग्नाला तयार नव्हता. शेवटी तो लग्नाला तयार झाला, तेव्हा लेखकांनी त्याला पुस्तके भेट दिली.  आणि त्यावर 'साहित्याशी एकनिष्ठ रहा आणि जीवनाशीही' असा संदेश लिहिला. गटणे आयुष्यात मार्गाला लागला आणि त्याच्या जीवनातला साहित्याचा बोळा निघाला. पाणी वाहते झाले! 
 चितळे मास्तर - चितळे मास्तर हे तीस वर्ष गावच्या शाळेत पहिली ते मॅट्रिक पर्यंत शिकवायचे. इतक्या वर्षाच्या  प्रामाणिक नोकरीत त्यांनी गावच्या अनेक मुलांची मॅट्रिक पास करवून घेतली म्हणूनच शाळेला गावातील सर्वजण 'चितळे मास्तरांची शाळा' म्हणायचे. मास्तरांनी छडी कधीही वापरली नाही. त्यांच्या जिभेचेच वळण इतके तिरके होते की, तो मारच पुष्कळ असायचा. ते ११-५ शाळा करायचे आणि शाळा सुटल्यावर कच्या मुलांचे वर्ग घ्यायचे. घोकंपट्टी ,पाठांतर ह्या विषयांवर चितळे मास्तरांचा भक्कम विश्वास. पण ते पाठांतर मात्र मजेत व्हायचे. वर्गामध्ये त्यांनी कोणाची चेष्टा केली तर कोणत्या मुलाने अगर मुलीने ती मनावर घेतली नाही. ना कधी कोणत्या पालकांची चिट्ठी आली. मास्तरांनी आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेमळ शब्द न वापरता प्रेम केले. मॅट्रिकच्या वर्गातील हुशार मुलांसाठी चितळेमास्तर सकाळी पाच वाजता स्वतःच्या घरी शिकवणी घ्यायचे. ते पण फुकट! त्यांनी आयुष्यभर एकच व्रत केले, आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला घासून पुसून जगात पाठवून देणे. आणि हे काम करण्यात त्यांनी आपल्या चपलांच्या टाचा झिजवल्या.
अण्णा वडगावकर -  अण्णा खरेतर पेशाने संस्कृतचे प्राध्यापक होते. पण त्यांचे वर्गातील शिकवणे मात्र एकापेक्षा अधिक भाषांमध्ये चालायचे. संस्कृत सारख्या विषयाच्या तासाला वर्गात हशा चाललेला असे आणि कधीकधी तर विद्यार्थ्यांच्या हसून हसून मुरकुंड्या वळायच्या.प्रत्येक तीन-चार शब्दांनंतर 'माय गुड फेलोज' हे संबोधन ठरलेलं. पण वडगावकर प्रोफेसरांनी फक्त संस्कृत कधीच शिकवले नाही तर त्यांनी वर्गात व्यवहार शिकवला. त्यांनी मुलांना 'लाईफ' शिकवली. म्हणूनच सगळया विद्याथ्यांचे ते आवडीचे प्रोफेसर होते.
अंतू बर्वा - रत्नागिरीच्या 'त्या' मधल्या आळीमध्ये लोकोत्तर पुरुष राहायचे आणि अंतू बर्वा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. अंतूशेट आणि त्याच्या सांगाती यांचे जीवनाविषयी एक अचाट तत्वज्ञान होते. आणि 'अण्णू गोगट्या होणे'  म्हणजे पडणे, 'अजगर होणे'  म्हणजे झोपणे अशी विशिष्ट परिभाषा असे, जी नवख्या माणसाला उमगणे केवळ अशक्य. ह्या अड्ड्यातील विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोश तयार होईल! अंतूशेट आणि 'त्या' आळीतले सारेच नमुने एकाच आडवळणाचे. कुणाचे बरे झाल्याचे सुख नाही, वाईट झाल्याचे दुःख नाही. जन्माचे सोयर नाही, मरणाचे सुतक नाही. गाण्याची रुची नाही, तिटकार ही नाही. खाण्यात चवीपेक्षा उदरभरण हाच स्वच्छ हेतू!आयुष्याची गाडी कधी वेगाने धावली नाही पण कधी थांबली ही नाही. राजकारण हा ह्या अड्ड्याचा लाडका विषय. तो निघाला की अंतूशेटच्या जिभेवर सरस्वती नाचे. जीवनातल्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क त्याने प्यायला होता देव जाणे! दारिद्याच्या गडद काळोख्यात अंतू बर्व्याने आयुष्य एकाकी, आपल्या मताच्या पिंका टाकीत पण शिष्टतेने काढले. रत्नागिरीच्या फणसासारखा अंतू देखील वरून कठीण आणि आतून गोड व रसाळ होता. आणि हा गोडवा सुध्दा खूप पिकल्यावरच आला होता!

वरील पात्रांशिवाय पेस्तन काका,नंदा प्रधान,गजा खोत ह्यासारखी एकूण २० पात्रे पुस्तकात आहेत. ही पात्रे आपल्याला खळखळून हसवतात तर काही पात्रे अंतर्मुख ही करतात. पुल म्हणाले होते की, ही माणसे जर जिवंत होऊन कधी भेटली, तर मी त्यांना कडकडून भेटेन. पुस्तक संपल्यावर प्रत्येक वाचकाची काहीशी अशीच अवस्था होते! आणि ह्यालाच 'प्रतिभावंत' लेखन म्हणतात!

पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक -Vyakti ani valli


Monday, June 29, 2020

राऊ

राऊ 


ना.सं.इनामदार 



 

बाजीराव-मस्तानी ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अजरामर झालेली प्रेमकथा आहे. बाजीरावांचे नाव घेताच मस्तानीचे नाव आपसूकच त्याला जोडले जाते. परंतु, बाजीरावांचे मस्तानीसोबतचे नाते जितके घट्ट होते, तितकेच घट्ट नाते त्यांचे शौर्या सोबत होते, हे फार थोड्या लोकांना माहित असावे. बाजीरावांचे अवघे आयुष्यचं रोमहर्षक प्रसंगांनी आणि संघर्षाने भरलेले होते. राऊ हि कादंबरी केवळ प्रेमकथा नसून, ना. सं. इनामदारांनी बाजीरावांच्या आयुष्यातील संघर्ष कथा वाचकांसमोर मांडली आहे. ना. सं. चे ओघवते आणि ललित लेखन हे या कादंबरीचे प्रमुख वैशिट्य आहे. 

पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथांनंतर वयाच्या बाराव्या वर्षी बाजीरावांनी पेशवेपदाची धुरा हाती घेतली आणि त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. अख्या हिंदुस्थानभर पेशव्यांनी आपल्या सत्तेची जरब बसवली आणि साताऱ्याच्या शाहू महाराजांचा विश्वास संपादन केला. बाजीरावांना संपूर्ण हिंदुस्थान 'श्रीमंत' म्हणत पण खाजगीत मात्र ते सगळ्यांचे 'राऊ' होते. लहानपणा पासूनच राऊंच्या स्वभाव बेबंद होता. बाजीरावांना अपयश कसे असते हे माहीतच नव्हते. जी जी मोहीम, जे जे राजकारण त्यांनी हाती घेतले, ते राऊंनी फत्ते केले. ह्या यशामध्ये त्यांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पांची त्यांना समर्थ साथ लाभली. 

चिमाजीआप्पांचे फडाच्या राजकारणावर बारीक लक्ष असायचे. बाजीरावांच्या मागे ते राजकारणाचा वसा कुशलतेने सांभाळायचे.आप्पांचा त्यांच्या वहिनी, काशीबाईंवर विशेष जीव होता. काशीबाई अत्यंत साध्या-सरळ स्वभावाच्या होत्या. फडावरची राजकारणे त्यांना कधी कळलीच नाही किंबहुना त्यांनी त्यात कधी लक्ष घातलेच नाही. डोळ्यात तेल घालून राऊंची वाट बघणे आणि डोळ्यांतून अश्रू ढाळत मनात दाटलेल्या दुःखाला वाट मोकळी करणे, इतकेच त्यांना कळायचे. राऊंच्या प्रपंचाचा भार त्यांनी प्रबळपणे उचलला. सगळ्यांच्या तब्येतीची काळजी त्या घ्यायच्या. विशेषतः त्यांच्या सासू राधाबाई यांच्या. राधाबाई ह्या अतिशय तीक्ष्ण आणि चतुर होत्या. काशीबाईंच्या उलट त्यांचे राजकारणात विशेष लक्ष असायचे. पेशव्यांकडून दानधर्म, रीतिरिवाज ह्यात कोणतीही त्रुटी राहू नये ह्याकडे त्या जातीने लक्ष द्यायच्या.

वयाच्या ऐन उमेदीत बाजीराव यशाच्या झपाझप पायऱ्या चढत असताना एकदिवस त्यांची नजर मस्तानीवर पडते आणि त्यांच्या आयुष्यात संघर्षाचा वनवाच जणू पेटतो. मस्तानी हि एक यवनी कलावंतीण होती. तिला अलौकिक सौंदर्य आणि जोडीला असामान्य मधुर आवाजाची दैवीदेण  होती. ती बोलण्यात नम्र आणि चतुर होती. ह्याच रूपावर बाजीराव भाळले आणि मस्तानीशी राऊंचा जीव जडला आणि त्यांनी तिला आश्रय दिला. अशाप्रकारे राज्यकर्त्यांनी कलावंतीला आश्रय देण्याचा हा पहिला प्रसंग होता असे नाही. परंतु राऊंच्या मस्तानीसोबतच्या 'नाजायज' संबंधांना बाजीराव 'प्रेमाची' उपमा देउन 'नाते' बनवू पाहत होते, हे त्याकाळच्या कर्मठ समाजाला खटकले. त्यातच राऊंनी मांसभक्षण  सुरु केले. इतकेच नव्हे तर  मद्यपानाचे व्यसन ही जडले. ह्यामुळे पुण्याच्या ब्राह्मण वर्गाने शनिवारवाड्यावर बहिष्कार टाकला. ह्या सर्वात राधाबाई दुखावल्या गेल्या. आप्पांना सुद्धा याचे वाईट वाटत होतेच. पण पेशवे मात्र प्रेमाच्या धुंदीत होते. मस्तानीच्या प्रेमात ते इतके बुडाले होते की, 'राऊ तिथे मस्तानी' असा आग्रह त्यांनी धरला आणि बाजीरावांनी यवनी मस्तानीला शनिवारवाड्यात आणून ठेवले. 

पेशवीणबाई म्हणून शनिवारवाड्या मध्ये मिरवणाऱ्या काशीबाईंना ह्यामुळे प्रचंड दुःख झाले. त्यांना होणाऱ्या वेदना अवर्णनीय होत्या. त्यामुळे त्यांनी थेट अंथरुनच धरले आणि अन्न त्याग सुरु केला. संपूर्ण हिंदुस्थानभर बाजीरावांच्या वागण्याची दबकत चर्चा सुरु झाली. सगळ्यांनीच पेशव्यानां समजावण्याचा प्रयत्न केला पण पेशवे प्रेमात बेभान झाले होते. दुसरीकडे मस्तानीला  बाजीरावांसारख्या तुफानाशी संबंध जोडून आपण पाचोळ्यासारखे उडून जाऊ अशी सतत भीती वाटे. पण बाजीराव नेहमीच ढाल बनून मस्तानी समोर उभे राहायचे.विस्तवाची दाह त्यांनी कधीच मस्तानी पर्यंत पोहचू दिली नाही.परंतु मस्तानीला सगळे समजत होते. आणि आपल्यामुळे राऊंचे कुटुंब त्यांच्या पासून दूर झाले, ह्याचे तिला वाईट वाटे. 

सगळ्यांचे सगळे प्रयत्न करून झाले,परंतु बाजीरावांपासून मस्तानीला दूर करणे शक्य झाले नाही.शेवटी बाजीराव उत्तरेला मोहिमेवर गेले असता नानांनी मस्तानीला कैद केले. हि गोष्ट राऊंना समजताच,त्यांच्या संतापला सीमा राहिली नाही.त्यांना ज्वराने विळखा घातला. आप्पांनी मस्तानीची सुटका केली पण बाजीरावांना मस्तानीचा विरह असह्य झाला. त्यांचा ज्वर दिवसेंदिवस वाढत जाऊ लागला. कित्येक वैद्य झाले पण त्यांच्या आजारावर जुलमी इलाज फक्त मस्तानी होती. ते ग्लानी मध्ये बोलू लागले. त्यांची प्रकृती खूपच ढासळली आणि सगळ्यांनी आशा सोडून दिल्या. निजामा पासून ते दिल्ली च्या मुघलांपर्यंत सर्वांची आव्हाने बाजीरावांनी तलवारीच्या टोकावर पेलली पण स्वतःच्या खाजगी आयुष्याच्या रणांगणावर मात्र राऊंनी अक्षरशः तलवार म्यान केली.विस्तवासारखा रणांगणात पेटणारा वणवा किरकोळ ज्वराने शमवला. आणि मराठा दौलतीचे 'स्वामी' सर्वांना पोरके करून कायमस्वरूपी मस्तानीचे प्रियकर होण्यासाठी आसमंतात विलीन झाले. 

बाजीराव शत्रूशी निधड्या छातीने लढले आणि त्यांनी प्रेम पण निडरपणे केले. त्यांच्या प्रेमाला कोणतीच सीमा वा बंध नव्हते. पण समजासमोर पेशव्यांनी सुद्धा हात टेकले. संपूर्ण हिंदुस्थानभर मराठ्यांचा भगवा त्यांनी डौलाने फडकवला.पण तरीदेखील आजही त्यांची ओळख एक 'योद्धा' म्हणून नव्हे तर मस्तानीचे 'प्रियकर 'म्हणूनच आहे. 

पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक -RAU

Monday, May 25, 2020

Asa Mi Asa Mi

असा मी असा मी 

 पु.ल.देशपांडे  




"  जन्म आणि मृत्यू या टोकांच्या मध्ये नियतीने चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून आपली आणि आपल्या भोवतालच्या माणसांची 'हसवणूक' करण्यापालीकडे आणखी काय करायचे "
हे ज्यांच्या आयुष्याचे व्रत होते असे महाराष्ट्राचे आवडते व्यक्तीमत्त्व म्हणजे  पु. ल. देशपांडे. 'असा मी असा मी'  हे पु. ल. देशपांडे लिखित विनोदी पुस्तक,कित्येक दशकं वाचकांचे मनोरंजन करत आहे. जीवनात नितांत आनंद मिळवायचा असेल तर पु. लं. चे हे पुस्तक म्हणजे निव्वळ खजिनाच आहे!

'असा मी असा मी' हे एका मध्यमवर्गीय कारकुनाचे आत्मचरित्र आहे. खरतरं,आत्मचरित्र हा खूपच जड़ शब्द झाला.हे पुस्तक म्हणजे त्याच्या सुख-दुःखाचा मनमोकळा संवादच आहे. तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य माणसाचे मनोगतच म्हणा!

हि गोष्ट आहे धोंडोपंत भिकाजी कडमडेकर ह्या कोकणी गृहस्थाची,जो नोकरी निमित्त मुंबईत स्थायिक झाला आहे. 'धोंडोपंत' हे नाव काही आत्मचरित्र लिहण्याइतके दमदार नसले तरी, 'नावत काय आहे?' असे खुद्द शेक्सपियर म्हणून गेलाय. धोंडोपंतांचे नाव जरी 'दमदार' नसले तरी त्यांची गोष्ट मात्र नक्कीच 'दमदार' आहे. 

१९६० च्या दशकातील मुंबई ही आत्ता सारखीच  fast & busy होती.गर्दी हा मुंबईचा अविभाज्य भाग होता अणि धोंडू हा ह्या गर्दीमधील एक छोटासा ठिपका होता.केस पांढरे होवूपर्यंत निष्ठेने चाकरी करायची आणि पेंशनी च्या पैशांमध्ये डोळे मिटण्याची वाट बघणाऱ्या typical मराठी माणसांपैकी हा ही एक.धोंडू उर्फ़ बेंबटया हा  कुटुंबसहित चाळी मध्ये रहायचा. चाळीच्या दोन खोल्यांमध्ये आपल्या सात माणसांच्या कुटुंबाचा पसारा मांडला होता. धोंडू 'बेन्सन' ह्या इंग्रजी हापिसात(ऑफिसात) clerk  होता. त्याचे आयुष्य रेल्वे च्या पटरी प्रमाणे इतके सरळ होते की कला,छंद ,राजकारण,समाजकारण किंवा धर्म-श्रद्धा यासारख्या गोष्टींचा त्याचा क्वचितच संबंध यायचा. 

रस्ता मोकळा असताना ही रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या 'कॅटेगिरी' मधील एक म्हणजे धोंडू. आपण,आपले कुटुंब आणि आपले चार सहकारी इतकेच त्याचे जग आणि आस्तित्व सुद्धा. धोंडूच्या ह्या छोटया, सुटसुटीत जगामधील घडणाऱ्या गंमती -जमती आणि लोकांच्या स्वभावांचे खुसखुशीत वर्णन धोंडूनें आपल्या आत्मचरित्र/मनोगतामध्ये केले आहे.अगदी कुटुंबा सोबत (बायकोला धोंडू असे संबोधतो) ची साडी खरेदी असो, हापिसातील (ऑफीसातील) सहकाऱ्यांसोबत कोणा 'बाबा' (महाराजांचा) दर्शनाचा प्रसंग असो ,बायकोच्या मावशीच्या घराचा पत्ता शोध मोहीम असो किंवा फुकट मिळालेल्या नाटकाच्या तिकिटावर नाटक पाहण्याचा प्रसंग असो. धोंडू वाचकांना निखळपणे हसवतो. 

आचरट मुले, typical बायको,चित्र-विचित्र सहकारी आणि कटकटे शेजारी ह्यांच्या मध्ये रमलेल्या धोंडूच्या आयुष्यात स्वातंत्र्य नंतर बरेच बदल येतात.बेन्सन कंपनी हि बेन्सन अँड मंगलदास होते. धोंडोपंतांचे प्रमोशन होते आणि धोतराच्या जागी सूट-बूट येतो.चाळीतील कुटुंब flat मध्ये जाते. भिंतीच्या रंगसंगती आणि खिडकीच्या पडद्यांवर खर्च होऊ लागतो.तुळशीचे वृंदावन जाऊन घरी cactus चे रोप येते. पूर्वी भजनी मंडळा मध्ये रमणारे कुटुंब (बायको) आता club मध्ये रमू लागते. मुलांच्या शाळेतून parents meetings साठी बोलावणी येऊ लागतात. धोंडू सुद्धा सोसायटीच्या badminton club चा प्रेसिडेंट बनतो.एकूणच संपूर्ण 'family' काळानुसार 'update' होते आणि 'smart ' बनते.

परंतु चाळ बरी की सोसायटी? धोंडूचा आणि मुलाचा पिक्टरच्या हिरो-हिरोईन वर चा मुक्त संवाद चांगला कि धोंडूच्या वडिलांचा सुभाषिते आणि पाढे पाठ करून घेण्याचा नित्यक्रम? मुलांच्या शाळेतील मिटींग्स हितकारक कि धोंडूच्या चितळे मास्तरांच्या घरी घेतलेल्या शिकवण्या? असे अनेक प्रश्न धोंडूला शेवटी पडतात. ह्याची उत्तरे त्याच्याकडेही नाहीत. पण हे प्रश्न मात्र वाचकांना अंतर्मुख करायला लावतात. आणि मग आपल्याला आणि बहुदा धोंडुला हि प्रश्न पडला असावा की धोतरातले साधे जीवन जगणारा 'असामी' बरा? की सूट-बुटाच्या रंगीत दुनियेतील 'असामी' बरा? म्हणूनच धोंडू म्हणतो, 
'जसा मी तसा मी असामी असामी ' :-)



पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक - Asa mi asa mi