Wednesday, December 29, 2021

Anudini

श्रीयुत गंगाधर टिपरे 

अर्थात 

"अनुदिनी"

दिलीप प्रभावळकर 

हानपणी आम्ही सगळे कुटुंब मिळून "श्रीयुत गंगाधर टिपरे " हि मालिका खूप आवडीने आणि न चुकता बघायचो. अगदी आज्जी -बाबांपासून  (आजोबा) ते माझ्या पर्यंत सर्वांचीच ती मालिका लाडकी होती. दिलीप प्रभावळकर, ज्यांनी मालिकेत प्रमुख भूमिका केली आहे, त्यांच्या "अनुदिनी" ह्या पुस्तकावर आधारित हि टिव्ही मालिका आहे, हे समजल्यापासूनच ते पुस्तक वाचायची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. आणि finally तो योग आला. नियमित अनुदिनी म्हणजे Diary लिहिणारा कोणी म्हणजे great च. परंतु, लेखकांनी एक नव्हे तर संपूर्ण कुटुंब रोज अनुदिनी लिहिते,अशी कल्पना करून सभोवतालच्या हलक्या फुलक्या प्रसंगांचे खुसखुशीत आणि विनोदी वर्णन केले आहे. भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आसपासच्या दुनियेत घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक प्रसंगांचे आणि उलथापालथीचे हे मध्यमवर्गीय कुटुंबातील पाच जण साक्षीदार आहेत आणि या  कुटुंबातील तीन पिढ्यांतील माणसे एकाच घटनेकडे कशी बघत असतील, याची  कल्पना करून, त्यांचा दृष्टीकोन कधी मिश्किल पणे, तर कधी गंभीरपणे लेखकांनी पुस्तकातून मांडला आहे. 

टिपरे कुटुंबातील सदस्यांची रोज diary लिहणे ही common  सवय सोडता, बाकी सर्वच भिन्न आहे. शेखर टिपरे, टिपऱ्यांचे कुटुंबप्रमुख,मुंबईतील टिपिकल कॉमन मॅन च्या व्याख्येत तंतोतंत बसतात. साहित्य,नाट्य,संगीत वैगरे गोष्टींमध्ये ह्यांना विशेष रस होता. दरवर्षी ते resolution करत की त्यांच्या ह्या आवडींसाठी खास वेळ काढायचा,पण ऑफिस -घर ह्या चाकोरीत त्यांना ते कधीच जमत नसे. शेखर टिपऱ्यांना चिडचिड करण्यासाठी एरवी काही कारण लागत नसे, परंतु, राजकार-समाजकारण हे त्यांच्या तापाचे खास विषय. आपल्या मुलांसाठी आपण एक मार्गदर्शक, मित्र आणि तत्वज्ञ वैगरे असावे असे त्यांना वाटायचे. परंतु, मुलांचे काळानुसार बदललेले आदर्श आणि तऱ्हेवाईक क्रेझ ह्यामुळे ते शक्य नव्हते याची जाणीव त्यांना ही होती.आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि मार्गी लागावे अशी चारचौघांच्या बापाची असते, तशीच श्री टिपऱ्यांची पण इच्छा होती. आपण त्यांच्या वयाचे असताना आपल्या करिअरच्या माफक आणि टिपिकल अपेक्षा आणि आपल्या मुलांची  क्रिकेटर वा ऍक्टर बनायची स्वप्ने यातील विसंगती त्यांना प्रकर्षणाने जाणवे आणि त्यामुळे त्यांचे मन नेहमी अस्वस्थ होई. 
शेखर टिपऱ्यांप्रमाणेच त्यांच्या पत्नी म्हणजे श्यामला टिपरे ह्यांना पण मुलांच्या भवितव्याची सतत चिंता असे. खरेतर सौ टिपरे सतत कोणत्या ना कोणत्या तरी काळजीत असत.त्या दिवसभर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये गुरफटलेल्या असे, त्यामुळे करियर करणाऱ्या कर्तृत्ववान बायकांचा त्यांना नेहमी हेवा वाटे. आपणही पैसे मिळवले पाहिजे असे त्यांना नेहमी वाटे. म्हणूनच कधी पाळणाघरात सेविका तर कधी खाजगी शिकवणी असे कुठे ना कुठे तरी चिकटायची त्यांची खटपट चालू असे. नाकाच्या problem मुळे गर्ल्स हायस्कुलच्या शिक्षकेची नोकरी सोडून आपण गृहिणी झाल्यापासून घरातल्यांनी आपल्यला गृहीत धरले आहे, अशी खंत त्यांना नेहमी वाटे. राजकारण, क्रिकेट वैगरे विषयात त्यांना काही रस नव्हता पण, जेवताना ह्यावर चाललेली चर्चा त्या न कंटाळता ऐकत. बालमैत्रिणींची भेट किंवा नंदेने अमेरिकेहून आठवणीने आणलेल्या भेटवस्तू ह्या सारख्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये त्या आनंद शोधत. आपली मुले,सासरे आणि पती हेच सौ टिपऱ्यांचे छोटेसे जग होते. 
सौ व श्री टिपरे जितके सरळ आणि एकमार्गी होते, त्या उलट त्यांची दोन्ही मुले बिनधास्त व चंगळवादी होती. मोठा मुलगा श्रीशैल उर्फ शिऱ्या, ह्याचे ग्रॅड्युएशन झाले होते. त्याच्या नोकरीची चिंता ही त्याला सोडून कुटुंबातील बाकी सर्वांना होती. क्रिकेट वर त्याचे विशेष प्रेम होते. एक तर क्रिकेटर बनायचे किंवा क्रिकेट ची टीम असलेल्या कंपनी मधेच नोकरी करायची, असे त्याचे स्वप्न होते. भारताने क्रिकेट ची मॅच हरली की, शिऱ्याचा mood off  झालाच म्हणून समजा. आणि तो राग नेहमी जेवणावर निघे. क्रिकेट बरोबरच श्रीशैल टिपऱ्यांना 'डिटेक्टिवगिरी' ची आवड होती. परंतु हे hidden talent दाखवायला त्याला आते बहिणीच्या अफेयरची माहिती काढणे  किंवा हरवलेली मांजर 
वैगरे शोधणे, अशी बारीक-सारीक कामेच मिळत. एकदिवस आपण मोठे डिटेक्टिव्ह बनू, अशी त्याला अशा होती. तर दुसरीकडे, शिऱ्याच्या बहिणीला, शलाकाला ऍक्टर बनायचे होते. कॉलेजचे lectures करण्यापेक्षा, मार्क्स कमी पडल्यावर आईवडिलांचे lecture ऐकणे तिला जास्त सोयीचे वाटे. मित्र-मैत्रिणीं बरोबर बर्थडे पार्टी करणे,सहलीला जाणे, विविध beauty treatment करणे वैगरे गोष्टींमध्ये टिपऱ्यांचे हे शेंडेफळ व्यस्त असे. मधूनच शलाका health consciousness च खूळ डोक्यात घेई तर, कधी  photo shoot चे. ऋतू बदलावा तसे तिचे mood बदलायचे. 

शिऱ्या आणि शलाकाचा वात्रटपणा पाठीशी घालणारी व्यक्ती म्हणजे त्यांचे आजोबा, गंगाधर टिपरे. Senior टिपऱ्यांना सर्वजण "आबा" म्हणायचे.आबांचे वय जरी ८० असले तरी, त्यांची energy ही एका तरुणाला लाजवेल अशी होती. ते खूपच fitness freak होते. त्यांचा रोजचा व्यायाम कधी चुकायचा नाही. स्वतःच्या तब्येतीला ते फारच जपत. आपली घरात मदत व्हावी म्हणून ते छोटी मोठी कामे करू पाहत, पण नेमके काहीतरी उलटे होत आणि double कामे त्यांच्या सुनेला लागत. आबांना राजकारण ,क्रिकेट, संगीत आणि चित्रपट वैगरे विषयात गाढे ज्ञान आणि आवड पण होती. या विषयावर स्वतःची मते ते परखडपणे मांडत. आबांनी स्वातंत्र्यपूर्वीचा आणि स्वतंत्र्यानंतरचा भारत,दोन्ही पहिले आहेत. भारताला स्वतंत्र मिळाले तेव्हा आपला उत्साह आणि रोमांच, ५० वर्षांनी कुठेतरी लोप पावला आहे, असे त्यांना सोसायटीच्या सुवर्णमोहत्सवी कार्येक्रमामध्ये वाटते.  नवीन पिढीच्या स्वछंदी वागण्याला त्यांची कधी ना नव्हती, परंतु या पिढीची वास्तव आणि आदर्श ह्यात गफलत होते असे त्यांचे मत होते. त्यांची नात, योगिता हिचे trial marriage वैगरे भानगडी आबांच्या कल्पनेच्या पलीकडील होत्या. तरीही ही गोष्ट त्यांनी संयमाने accept केली.आपले घरचे आपली काळजी घेतात,सेवा करतात आणि घरच्या सगळ्यांना आपण हवेसे वाटतो, याची सुखद जाणीव आबांना होती. नातवंडे, सून-मुलगा ह्यांच्या सोबत ते खुश होते पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात, पावलोपावली आपल्या सहचारणीची कमी त्यांना जाणवत असे. 

टीव्ही वरील क्रिकेट एकत्र पाहणे, लतादीदीचे कॉन्सर्ट श्रद्धाळूपणे ऐकणे, सोसायटीमध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी होणे हीच टिपऱ्यांची सुखाची कल्पना. देशाच्या भविष्यावर चिंता करणे, राजकारण्यांचा तीळतीळ करणे आणि सगळे विसरून दुसऱ्यादिवशी पुन्हा आपले धकाधकीचे routine पाळणे हे रोजचेच होते. मराठी मध्यमवर्गाचे हे असे हताशपणे सुख शोधणे आणि कोणत्याही आदर्शाशिवाय केवळ जगण्यामागे फरपटने हे लेखकाच्या विनोदी लेखनातून फार गंभीरपणे आले आहे. 

टिपरे कुटुंबाच्या रोजनिशीतील पाने वाचताना प्रत्येक मराठी वाचकाला deja vu झाल्याशिवाय राहत नाही. पुस्तक वाचताना आपण कोणत्या ना कोणत्या पात्राशी स्वतःला relate करू पाहतो. आबा,शिऱ्या ,शलाका ,श्यामला आणि शेखर ह्यांच्या डायऱ्या वाचून आपल्याला सर्वजण आपलेसे वाटू लागतात आणि त्यांच्यावर लोभ जडतो. 


पुस्तक विकत घेण्याची लिंक -Anudini




4 comments: