Monday, June 21, 2021

Vyakti Aani Valli

 व्यक्ती आणि वल्ली 

पु. ल . देशपांडे 


       युष्यात आपण बऱ्याच लोकांना भेटतो.काही व्यक्ती काळानुसार विस्मरणात जातात तर काही लोक मात्र त्यांच्या स्वभावामुळे 'चांगलेच' लक्षात राहतात."व्यक्ती तितक्या प्रकृती" नुसार व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो.परंतु तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरून त्याला विनोदाची खुशखुशीत फोडणी देऊन,साऱ्या महाराष्ट्राला खळखळून हसवण्याची कसब फक्त एकाच व्यक्तीने साधली ती म्हणजे पु ल देशपांडे नी! १९४३ साली अभिरुची मासिकाच्या एका अंकामध्ये 'अण्णा वडगावकर' हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले आणि ते मराठी वाचकांच्या प्रचंड पसंतीस आले. नंतर १९६३ पर्यंत प्रसिद्ध झालेली एकूण २० व्यक्तिचित्रे 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकाच्या माध्यमातून संग्रहित झाली.आज कित्येक दशके उलटूनही हा संग्रह मराठी वाचकांचे मनोरंजन करत आहे आणि करत राहील ह्यात दुमत नाही.व्यक्ती आणि वल्ली वाचताना प्रत्येक पात्राचे पुलं नी केलेले चोखंदळ वर्णन वाचल्यावर ही व्यक्ती आपल्याला कधीतरी भेटली आहे किंवा आपल्यातीलच एक आहे अशी भावना आल्याखेरीज राहत नाही.आणि मग प्रत्येकामध्ये एक 'वल्ली' लपलेला असतो तो फक्त टिपता आला पाहिजे हे पुलं च वाक्य शंभर टक्के पटते. अश्याच वीस वल्लींपैकी मला आवडलेली काही पात्रे :
नारायण- नारायण हा एक असा नमुना आहे की,प्रत्येकाचा कुठून ना कुठून तरी नाते लागणारा नातलग.कुठल्याही मंगलकार्याला स्वयंसेवकगिरी हा जन्मसिद्ध हक्क असलेला. घरात कार्य निघाले की जो वेळेवर टपकतो (कधी-कधी आगंतुक) तो म्हणजे नारायण.लग्नाचीच गोष्ट घेतली तर मुलगी बघण्याच्या कार्यक्रमापासूनच नारायण हजर असायचा,ते मुलगीची वरात मांडवातून निघूपर्यंत त्याची धावपळ चालूच असायची.त्यामुळे प्रत्येक कामामध्ये नारायण हवाच, असा घरच्या प्रत्येकाचा आग्रह असायचा. महिलावर्गाची साडी खरेदी हा पुरुषांचा सर्वात नावडता भाग परंतु, नारायण मात्र त्यात सुद्धा हिरीरीने सहभाग घ्यायचा. अशाप्रकारे एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये निस्वार्थपणे राबणारा नारायण आत्ताच्या 'दार-बंद ' आणि 'narrow minded'  संस्कृतीमध्ये मिळणे अशक्य आहे. 
हरितात्या-  हरितात्या जगण्यासाठी  नेमका काय उद्योग करायचे हे कोणालाच माहित नव्हते. त्यांनी एक व्यवसाय कधी धड केला नाही. इतिहासातील प्रसंगांचे वर्णन हरितात्या असे काही करायचे की, शिवाजीमहाराज,रामदास किंवा तुकाराम हे त्यांचे बालमित्रच असावे. प्रत्येक प्रसंगामध्ये ते कुठे ना कुठे तरी स्वतःला गोवायचेच. मग, भले ती पावनखिंडाची लढाई असो किंवा रामदासांच्या बालपणीची एखादी गोष्ट. 'पुराव्याने शाबीत करीन' ही त्यांची ठरलेली catch phrase. इतिहासासारखा क्लीष्ट विषय हरितात्या इतका जिवंत करून सांगायचे की, ऐकणाऱ्याला तो आवडायला लागे. हरितात्यानी लहानपणी कधीच लेखकांना एक पैशाचा खाऊ दिला नाही, पण आपल्या इतिहासावरचा सार्थ अभिमान दिला.वार्धक्याने हरीतात्या गेले आणि त्यांच्यासोबतच 'पुराव्याने शाबीत करेन' हे वाक्यसुद्धा इतिहासजमा झाले. 
सखाराम गटणे -काही लोक असतात जे कमालीचं शुद्ध आणि छापील बोलतात. ते बोलतात तेव्हा असे वाटते की बालभारती मधला एखादा धडाच वाचून दाखवत आहेत. सखाराम गटणे हा या category चा संस्थापक असावा. लेखकांची आणि गटणे ची ओळख एका व्याख्यानानंतर सही घेण्याच्या निमित्ताने झाली. आणि गटणेच्या अति शुद्ध बोली मुळे स्वतः साहित्यिक असूनही लेखक थक्क झाले.'अनुज्ञा', 'मार्गदर्शन', 'जीवनानुभूती', 'साकल्याने मिळणारे समाधान' असल्या छापील शब्दांची अडगळ गटण्याच्या तोंडात नेहमी साठलेली असे. पेंटर बापाच्या घरी गटणे सारखी 'व्यासंगी' औलाद कशी काय उपजली हे लेखकांसाठी एक कोडेच होते. साहित्याशी एकनिष्ठ राहण्याचा विडा सख्याने उचलला होता आणि म्हणून तो लग्नाला तयार नव्हता. शेवटी तो लग्नाला तयार झाला, तेव्हा लेखकांनी त्याला पुस्तके भेट दिली.  आणि त्यावर 'साहित्याशी एकनिष्ठ रहा आणि जीवनाशीही' असा संदेश लिहिला. गटणे आयुष्यात मार्गाला लागला आणि त्याच्या जीवनातला साहित्याचा बोळा निघाला. पाणी वाहते झाले! 
 चितळे मास्तर - चितळे मास्तर हे तीस वर्ष गावच्या शाळेत पहिली ते मॅट्रिक पर्यंत शिकवायचे. इतक्या वर्षाच्या  प्रामाणिक नोकरीत त्यांनी गावच्या अनेक मुलांची मॅट्रिक पास करवून घेतली म्हणूनच शाळेला गावातील सर्वजण 'चितळे मास्तरांची शाळा' म्हणायचे. मास्तरांनी छडी कधीही वापरली नाही. त्यांच्या जिभेचेच वळण इतके तिरके होते की, तो मारच पुष्कळ असायचा. ते ११-५ शाळा करायचे आणि शाळा सुटल्यावर कच्या मुलांचे वर्ग घ्यायचे. घोकंपट्टी ,पाठांतर ह्या विषयांवर चितळे मास्तरांचा भक्कम विश्वास. पण ते पाठांतर मात्र मजेत व्हायचे. वर्गामध्ये त्यांनी कोणाची चेष्टा केली तर कोणत्या मुलाने अगर मुलीने ती मनावर घेतली नाही. ना कधी कोणत्या पालकांची चिट्ठी आली. मास्तरांनी आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेमळ शब्द न वापरता प्रेम केले. मॅट्रिकच्या वर्गातील हुशार मुलांसाठी चितळेमास्तर सकाळी पाच वाजता स्वतःच्या घरी शिकवणी घ्यायचे. ते पण फुकट! त्यांनी आयुष्यभर एकच व्रत केले, आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला घासून पुसून जगात पाठवून देणे. आणि हे काम करण्यात त्यांनी आपल्या चपलांच्या टाचा झिजवल्या.
अण्णा वडगावकर -  अण्णा खरेतर पेशाने संस्कृतचे प्राध्यापक होते. पण त्यांचे वर्गातील शिकवणे मात्र एकापेक्षा अधिक भाषांमध्ये चालायचे. संस्कृत सारख्या विषयाच्या तासाला वर्गात हशा चाललेला असे आणि कधीकधी तर विद्यार्थ्यांच्या हसून हसून मुरकुंड्या वळायच्या.प्रत्येक तीन-चार शब्दांनंतर 'माय गुड फेलोज' हे संबोधन ठरलेलं. पण वडगावकर प्रोफेसरांनी फक्त संस्कृत कधीच शिकवले नाही तर त्यांनी वर्गात व्यवहार शिकवला. त्यांनी मुलांना 'लाईफ' शिकवली. म्हणूनच सगळया विद्याथ्यांचे ते आवडीचे प्रोफेसर होते.
अंतू बर्वा - रत्नागिरीच्या 'त्या' मधल्या आळीमध्ये लोकोत्तर पुरुष राहायचे आणि अंतू बर्वा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. अंतूशेट आणि त्याच्या सांगाती यांचे जीवनाविषयी एक अचाट तत्वज्ञान होते. आणि 'अण्णू गोगट्या होणे'  म्हणजे पडणे, 'अजगर होणे'  म्हणजे झोपणे अशी विशिष्ट परिभाषा असे, जी नवख्या माणसाला उमगणे केवळ अशक्य. ह्या अड्ड्यातील विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोश तयार होईल! अंतूशेट आणि 'त्या' आळीतले सारेच नमुने एकाच आडवळणाचे. कुणाचे बरे झाल्याचे सुख नाही, वाईट झाल्याचे दुःख नाही. जन्माचे सोयर नाही, मरणाचे सुतक नाही. गाण्याची रुची नाही, तिटकार ही नाही. खाण्यात चवीपेक्षा उदरभरण हाच स्वच्छ हेतू!आयुष्याची गाडी कधी वेगाने धावली नाही पण कधी थांबली ही नाही. राजकारण हा ह्या अड्ड्याचा लाडका विषय. तो निघाला की अंतूशेटच्या जिभेवर सरस्वती नाचे. जीवनातल्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क त्याने प्यायला होता देव जाणे! दारिद्याच्या गडद काळोख्यात अंतू बर्व्याने आयुष्य एकाकी, आपल्या मताच्या पिंका टाकीत पण शिष्टतेने काढले. रत्नागिरीच्या फणसासारखा अंतू देखील वरून कठीण आणि आतून गोड व रसाळ होता. आणि हा गोडवा सुध्दा खूप पिकल्यावरच आला होता!

वरील पात्रांशिवाय पेस्तन काका,नंदा प्रधान,गजा खोत ह्यासारखी एकूण २० पात्रे पुस्तकात आहेत. ही पात्रे आपल्याला खळखळून हसवतात तर काही पात्रे अंतर्मुख ही करतात. पुल म्हणाले होते की, ही माणसे जर जिवंत होऊन कधी भेटली, तर मी त्यांना कडकडून भेटेन. पुस्तक संपल्यावर प्रत्येक वाचकाची काहीशी अशीच अवस्था होते! आणि ह्यालाच 'प्रतिभावंत' लेखन म्हणतात!

पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक -Vyakti ani valli


No comments:

Post a Comment

Eat That Frog!

  EAT THAT FROG! BRIAN TRACY E very year, we all set goals and resolutions for ourselves. It's only natural to want to better ou...