Monday, June 29, 2020

राऊ

राऊ 


ना.सं.इनामदार 



 

बाजीराव-मस्तानी ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अजरामर झालेली प्रेमकथा आहे. बाजीरावांचे नाव घेताच मस्तानीचे नाव आपसूकच त्याला जोडले जाते. परंतु, बाजीरावांचे मस्तानीसोबतचे नाते जितके घट्ट होते, तितकेच घट्ट नाते त्यांचे शौर्या सोबत होते, हे फार थोड्या लोकांना माहित असावे. बाजीरावांचे अवघे आयुष्यचं रोमहर्षक प्रसंगांनी आणि संघर्षाने भरलेले होते. राऊ हि कादंबरी केवळ प्रेमकथा नसून, ना. सं. इनामदारांनी बाजीरावांच्या आयुष्यातील संघर्ष कथा वाचकांसमोर मांडली आहे. ना. सं. चे ओघवते आणि ललित लेखन हे या कादंबरीचे प्रमुख वैशिट्य आहे. 

पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथांनंतर वयाच्या बाराव्या वर्षी बाजीरावांनी पेशवेपदाची धुरा हाती घेतली आणि त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. अख्या हिंदुस्थानभर पेशव्यांनी आपल्या सत्तेची जरब बसवली आणि साताऱ्याच्या शाहू महाराजांचा विश्वास संपादन केला. बाजीरावांना संपूर्ण हिंदुस्थान 'श्रीमंत' म्हणत पण खाजगीत मात्र ते सगळ्यांचे 'राऊ' होते. लहानपणा पासूनच राऊंच्या स्वभाव बेबंद होता. बाजीरावांना अपयश कसे असते हे माहीतच नव्हते. जी जी मोहीम, जे जे राजकारण त्यांनी हाती घेतले, ते राऊंनी फत्ते केले. ह्या यशामध्ये त्यांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पांची त्यांना समर्थ साथ लाभली. 

चिमाजीआप्पांचे फडाच्या राजकारणावर बारीक लक्ष असायचे. बाजीरावांच्या मागे ते राजकारणाचा वसा कुशलतेने सांभाळायचे.आप्पांचा त्यांच्या वहिनी, काशीबाईंवर विशेष जीव होता. काशीबाई अत्यंत साध्या-सरळ स्वभावाच्या होत्या. फडावरची राजकारणे त्यांना कधी कळलीच नाही किंबहुना त्यांनी त्यात कधी लक्ष घातलेच नाही. डोळ्यात तेल घालून राऊंची वाट बघणे आणि डोळ्यांतून अश्रू ढाळत मनात दाटलेल्या दुःखाला वाट मोकळी करणे, इतकेच त्यांना कळायचे. राऊंच्या प्रपंचाचा भार त्यांनी प्रबळपणे उचलला. सगळ्यांच्या तब्येतीची काळजी त्या घ्यायच्या. विशेषतः त्यांच्या सासू राधाबाई यांच्या. राधाबाई ह्या अतिशय तीक्ष्ण आणि चतुर होत्या. काशीबाईंच्या उलट त्यांचे राजकारणात विशेष लक्ष असायचे. पेशव्यांकडून दानधर्म, रीतिरिवाज ह्यात कोणतीही त्रुटी राहू नये ह्याकडे त्या जातीने लक्ष द्यायच्या.

वयाच्या ऐन उमेदीत बाजीराव यशाच्या झपाझप पायऱ्या चढत असताना एकदिवस त्यांची नजर मस्तानीवर पडते आणि त्यांच्या आयुष्यात संघर्षाचा वनवाच जणू पेटतो. मस्तानी हि एक यवनी कलावंतीण होती. तिला अलौकिक सौंदर्य आणि जोडीला असामान्य मधुर आवाजाची दैवीदेण  होती. ती बोलण्यात नम्र आणि चतुर होती. ह्याच रूपावर बाजीराव भाळले आणि मस्तानीशी राऊंचा जीव जडला आणि त्यांनी तिला आश्रय दिला. अशाप्रकारे राज्यकर्त्यांनी कलावंतीला आश्रय देण्याचा हा पहिला प्रसंग होता असे नाही. परंतु राऊंच्या मस्तानीसोबतच्या 'नाजायज' संबंधांना बाजीराव 'प्रेमाची' उपमा देउन 'नाते' बनवू पाहत होते, हे त्याकाळच्या कर्मठ समाजाला खटकले. त्यातच राऊंनी मांसभक्षण  सुरु केले. इतकेच नव्हे तर  मद्यपानाचे व्यसन ही जडले. ह्यामुळे पुण्याच्या ब्राह्मण वर्गाने शनिवारवाड्यावर बहिष्कार टाकला. ह्या सर्वात राधाबाई दुखावल्या गेल्या. आप्पांना सुद्धा याचे वाईट वाटत होतेच. पण पेशवे मात्र प्रेमाच्या धुंदीत होते. मस्तानीच्या प्रेमात ते इतके बुडाले होते की, 'राऊ तिथे मस्तानी' असा आग्रह त्यांनी धरला आणि बाजीरावांनी यवनी मस्तानीला शनिवारवाड्यात आणून ठेवले. 

पेशवीणबाई म्हणून शनिवारवाड्या मध्ये मिरवणाऱ्या काशीबाईंना ह्यामुळे प्रचंड दुःख झाले. त्यांना होणाऱ्या वेदना अवर्णनीय होत्या. त्यामुळे त्यांनी थेट अंथरुनच धरले आणि अन्न त्याग सुरु केला. संपूर्ण हिंदुस्थानभर बाजीरावांच्या वागण्याची दबकत चर्चा सुरु झाली. सगळ्यांनीच पेशव्यानां समजावण्याचा प्रयत्न केला पण पेशवे प्रेमात बेभान झाले होते. दुसरीकडे मस्तानीला  बाजीरावांसारख्या तुफानाशी संबंध जोडून आपण पाचोळ्यासारखे उडून जाऊ अशी सतत भीती वाटे. पण बाजीराव नेहमीच ढाल बनून मस्तानी समोर उभे राहायचे.विस्तवाची दाह त्यांनी कधीच मस्तानी पर्यंत पोहचू दिली नाही.परंतु मस्तानीला सगळे समजत होते. आणि आपल्यामुळे राऊंचे कुटुंब त्यांच्या पासून दूर झाले, ह्याचे तिला वाईट वाटे. 

सगळ्यांचे सगळे प्रयत्न करून झाले,परंतु बाजीरावांपासून मस्तानीला दूर करणे शक्य झाले नाही.शेवटी बाजीराव उत्तरेला मोहिमेवर गेले असता नानांनी मस्तानीला कैद केले. हि गोष्ट राऊंना समजताच,त्यांच्या संतापला सीमा राहिली नाही.त्यांना ज्वराने विळखा घातला. आप्पांनी मस्तानीची सुटका केली पण बाजीरावांना मस्तानीचा विरह असह्य झाला. त्यांचा ज्वर दिवसेंदिवस वाढत जाऊ लागला. कित्येक वैद्य झाले पण त्यांच्या आजारावर जुलमी इलाज फक्त मस्तानी होती. ते ग्लानी मध्ये बोलू लागले. त्यांची प्रकृती खूपच ढासळली आणि सगळ्यांनी आशा सोडून दिल्या. निजामा पासून ते दिल्ली च्या मुघलांपर्यंत सर्वांची आव्हाने बाजीरावांनी तलवारीच्या टोकावर पेलली पण स्वतःच्या खाजगी आयुष्याच्या रणांगणावर मात्र राऊंनी अक्षरशः तलवार म्यान केली.विस्तवासारखा रणांगणात पेटणारा वणवा किरकोळ ज्वराने शमवला. आणि मराठा दौलतीचे 'स्वामी' सर्वांना पोरके करून कायमस्वरूपी मस्तानीचे प्रियकर होण्यासाठी आसमंतात विलीन झाले. 

बाजीराव शत्रूशी निधड्या छातीने लढले आणि त्यांनी प्रेम पण निडरपणे केले. त्यांच्या प्रेमाला कोणतीच सीमा वा बंध नव्हते. पण समजासमोर पेशव्यांनी सुद्धा हात टेकले. संपूर्ण हिंदुस्थानभर मराठ्यांचा भगवा त्यांनी डौलाने फडकवला.पण तरीदेखील आजही त्यांची ओळख एक 'योद्धा' म्हणून नव्हे तर मस्तानीचे 'प्रियकर 'म्हणूनच आहे. 

पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक -RAU

1 comment:

  1. सही .....एकदम छान.. आटोपशीर पण राऊंचे आयुष्य पूर्ण वाचल्यासारखे वाटले...

    ReplyDelete