Tuesday, January 31, 2023

महाश्वेता

 

"महाश्वेता"

सुधा मूर्ती 

अनुवाद उमा कुलकर्णी 




हाश्वेता ही सुधा मूर्ती ह्यांनी लिहलेली एक प्रेरणादायी कादंबरी आहे. अंगावर कोडाचा डाग उमटणे म्हणजे जीवनाचा अंत मानणाऱ्या समाजात जेव्हा एखाद्या स्त्री च्या अंगावर असाच एक पांढरा डाग येतो, तेव्हा तो तिच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण घराण्यासाठी शाप बनतो. ही कादंबरी अशाच एका कोड फुटलेल्या नायिकेची कथा सांगते. चर्मरोगाने ग्रासलेली नायिका समाजाच्या ओझ्याखाली कोलमडते की धैर्याने तोंड देते, हे जाणून घ्यायची उत्कंठा वाचकांमध्ये शेवट पर्यंत निर्माण करण्यात लेखिका सुधा मूर्ती यशस्वी ठरतात. लेखिकेच्या प्रगल्भ विचार आणि आधुनिक जीवनाशी समन्वय साधणाऱ्या दृष्टीमुळे, या कथेला एक अलौकिक गहनता प्राप्त झाली आहे. म्हणूनच, पुस्तकाचा शेवट प्रत्येक वाचकास विचार करण्यास प्रवृत्त करतो.

कथेची नायिका अनुपमा ही नावाप्रमाणेच अद्वितीय सौंदर्यवती होती. अनुपमेची आई लहानपणीच वारली होती तर, तिचे वडील गावच्या शाळेमध्ये शिक्षक होते. तिची सावत्र आई तिचा मत्सर करी. घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा बेताचीच होती. नाटकाची अनुपमाला विशेष आवड होती. तिने कॉलेजमध्ये बऱ्याच नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या होत्या. अशाच एका नाटकाच्या प्रयोगामध्ये डॉक्टर आनंद तिला पाहतो आणि सौंदर्योपासक आनंद पाहताक्षणी तिच्या सौंदर्यावर भुलतो. आनंद हा श्रीमंत घरातील देखणा मुलगा असतो. अनुपमाला पाहताक्षणी ह्याच मुलीशी लग्न करायचे, हे तो पक्के करतो. आनंदची आई, राधाक्कांना हे लग्न अजिबात मान्य नसते. केवळ आनंद आणि समाजाच्या समोर मोठेपणा दाखवण्यासाठी त्या मनाविरुद्व जाऊन अनुपमा आणि आनंदच्या लग्नाला परवानगी देतात.

लग्नानंतर काही दिवसांतच आनंद पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला निघून जातो. श्रीमंतीचा गर्व असणारी सासू आणि पैश्याच्या जोरावर बेताल वागणारी नणंद गिरीजा, ह्यांच्या सोबत अनुपमा एकटीच अडकते. अशातच एकदिवस निखारा पाडण्याचे निमित्त होऊन तिच्या पायावर एक पांढरा डाग उमटतो. तो डाग कोडाचा आहे, हे जेव्हा अनुपमाला समजते, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. राधाक्कांना हे समजताच, अनुपमाने आणि तिच्या वडिलांनी त्यांची फसवणूक केली, असे आरोप करून त्या अनुपमाला माहेरी पाठवतात. माहेरीसुद्धा अनुपमेला अपमानास्पद आणि हीन वागणूक मिळते. यासर्वांतून आनंदच आपली सुटका करू शकेल या आशाने ती आनंदला अनेक पत्र लिहिते आणि त्याच्या उत्तराची ती चातकासारखी वाट बघते. पण आनंद चे उत्तर कधीच येत नाही. कोड घालवण्यासाठी अनेक उपास, औषधे चालू होती, पण कशालाच यश मिळत नव्हते. अशातच तिच्या कोडामुळे तिच्या सावत्र बहिणींची लग्न मोडू लागली. वाढत जाणारे कोड, सावत्र आई आणि बहिणीकडून मिळणारी तुच्छ वागणूक, सामाजिक-आर्थिक ओझ्यामुळे खचलेले वडील आणि नवऱ्याने नाकारल्याची भावना, ह्या सर्वांमुळे अनुपमा पुरती कोलमडून गेली होती. 

नेहमीप्रमाणे अनुपमा देवीच्या टेकडीवर पूजेसाठी  गेली असता, आनंदच्या भारतात परतण्याच्या आणि गिरिजाच्या लग्नाच्या गोष्टी तिच्या कानावर पडतात. एवढेच नव्हे तर आनंद सुद्धा पुन्हा लग्न करणार असे समजते. अनुपमाला मोठा धक्का बसतो. टेकाडावरून उडी मारून जीव देऊन ह्या त्रासातून कायमची सुटका मिळवण्याचा क्षणिक मोह तिला होतो. आपल्या आत्महत्येमुळे कुणालाही फारसे वाईट वाटणार नाही, तर काही काळ लोकांच्या दयेचा धनी होऊन भूतकाळात विलीन होऊ,असा विचार तिच्या मनाला चटका लावून जातो. अनुपवरच्या प्रेमाच्या एवढ्या गप्पा मारणाऱ्या आनंदने ती जीवंत आहे की नाही हे बघायला पण फिरकू नये आणि स्वतः डॉक्टर असूनही कोडासारखा रोग अनुवांशिक नाही एवढे सुद्धा आईला सांगण्याचे धैर्य दाखवू नये, ह्याचा अनुपमाला तिरस्कार वाटतो. रुप आणि पैश्याच्या जोरावर गिरीजा स्वतःची चारित्र्यहीनता लपवून समाजासमोर ताठ मानेने जगू शकत होती, याउलट एका पांढऱ्या डागामुळे आपले सद्गुण मातीमोल ठरले, याचा अनुपमाला संताप येतो. आणि तिचे मरणोन्मुख मन पुन्हा चेतनामय दिशेने झेपावू लागते. ती स्वतःच्या मनाशी निश्चय करते आणि टेकडीवरून खाली उतरते. 

आत्महत्येचा विचार झटकून अनुपमा थेट मुंबई गाठते आणि तिथे तिच्या कॉलेजच्या मैत्रिणीच्या घरी राहू लागते. लवकरच ती तिथे एक जॉब शोधते आणि आर्थिक स्वावलंबाच्या दिशेने पहिले पाऊल टाकते. पण एका स्त्रीचे जीवन एवढे सरळ सोप्पे कुठे असते? अनुपमाच्या मैत्रिणीचा नवरा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. ती तिथून कशीबशी निसटते आणि त्वरित स्वतःची दुसरीकडे राहायची व्यवस्था बघू लागते. डॉली, तिची नोकरीतील सहकारी तिच्या मदतीला येते आणि ती अनुपमाची स्वतःच्या घरी राहण्याची सोय करते. लवकरच अनुपमाला मुंबईच्या एका कॉलेज मध्ये संस्कृत शिक्षिकेची नोकरी मिळते आणि ती पुन्हा संस्कृत नाटकाच्या दुनियेत प्रवेश करते.

एकेदिवशी दुर्देवाने अनुपमाचा अपघात होतो. तिला जवळच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले जाते. तिथे तिची डॉक्टर वसंत आणि त्यांचा मित्र डॉक्टर सत्या सोबत ओळख होते. एकाच प्रांतातील, समभाषिक असल्यामुळे पेशंट आणि डॉक्टरच्या नात्यापलीकडे डॉक्टर वसंत आणि अनुपमाची मैत्री होते. अनुपमाप्रमाणेच वसंतचे विचार सुद्धा अत्यंत आदर्श होते. स्वतः अनाथ असल्यामुळे, डॉक्टर बनून गावी जाऊन गरिबांची सेवा करण्याचे स्वप्न वसंतने उरी बाळगले होते. वसंतला संस्कृत नाटकांचे वेड असल्यामुळे अनुपमा आणि वसंत ह्यांमधे वैचारिक देवाणघेवाण सुरु होते. पुढे सत्याला जेव्हा टायफाईड होतो आणि मेसच्या खाण्याऐवजी घरच्या खाण्याची गरज असते, तेव्हा अनुपमा स्वतःहून सत्याची स्वतःच्या घरी राहण्याची सोय करते आणि त्याची सेवा करते. सत्याला त्याच्या प्रेमभंगाचे दुःख अनावर वाटत होते तेव्हा अनुपम स्वतःच्या कटू भूतकाळाविषयी आणि तिच्या संघर्षाविषयी सांगते. हे जेव्हा वसंतला समजते तेव्हा अनुपमाविषयी त्याला अधिकच जिव्हाळा आणि आपुलकी वाटू लागते. वसंतला कोडाने ग्रासलेली 'महाश्वेता' अनुपमा कधी दिसलीच नाही, उलट बुद्धिवान, धारिष्ट्यवान आणि मन व हृदयाच्या दृष्टीने आगर्भ श्रीमंत असलेली अनुपमा दिसली. हिच आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी साथ देऊ शकेल, हे त्याच्या मनाने पक्के ओळखले. आणि एकदिवस वसंत अनुपमाला लग्नाची मागणी घालतो.

दुसरीकडे आनंदला दिवसेंदिवस आयुष्यातील अनुपमाची कमी प्रकर्षणाने जाणवू लागते. राधाक्कांच्या त्याच्या  लग्नाच्या सर्व प्रयत्नांना तो नाकारत होता. त्यातच त्याला गिरिजाच्या भूतकाळाचे सत्य समजते. वीज चमकल्या प्रमाणे आनंदच्या डोक्यात प्रकाश पडतो. अनुपमाचे सौंदर्य पांढऱ्या डागाने डागळेल म्हणून समाजच्या भीतीपोटी आपण अनुपमला दूर केले आणि आपल्याच घरी गिरीजचा स्वैराचार सोयीस्करपणे लपवला ह्याची तीव्र जाणीव आनंदला होते. आनंदला आपली चूक आता पुरती लक्षात येते आणि तो अनुपमला शोधण्यासाठी निघतो. बऱ्याच शोधाशोधीनंतर अनुपमा ह्या जगातच नसल्याचे आनंदला समजते, आणि हताश मनाने तो त्याचे शोधकार्य थांबवतो. परंतु नियतीच्या मनामध्ये दुसरेच असते. मुंबईला एका कॉन्फरन्सच्या निम्मिताने आला असता संस्कृत नाटकाच्या प्रयोगामध्ये आनंदला अनुपमा दिसते. तो अनुपमाला गाठतो आणि माफी मागतो. एवढेच नव्हे तर तिच्या सोबत नव्याने आयुष्य सुरु करण्याची इच्छा व्यक्त करतो. 

अनुपमाचा आनंदकडे परत जाण्याचा प्रश्नच नव्हता. होरपळून गेलेल्या बीजाला पुन्हा कोंब फुटणे अशक्य होते. अनुपमाला प्रेम, नवरा, माया हे सारे निरर्थक वाटत होते. त्यामुळे तिने आनंदला थेट नकार दिला. पण वसंत, ज्याने अनुपमला ती आहे तशी स्विकारण्याची इच्छा व्यक्त केली, त्याला उत्तर देणे अनुपमासाठी कठीण होते. तिने त्यासाठी विचार करण्याचा वेळ मागितला. अनुपमाचा नात्यांवरचा विश्वास पूर्ण उडाला होता. मुंबईच तिला स्वतःचे घर वाटत होते. तिला पुन्हा गावाच्या लोकांच्या तिरस्काराच्या नजरा आणि उसनी दया नको होती. म्हणून ती वसंतला सुद्धा नकार देते. पण त्याच्या समाजसेवेसाठी लागेल ती मदत करण्याचे वचन देते.

अनुपमाचा हा निर्णय काही वाचकांना चटका देऊन जातो. परंतु एक स्त्री म्हणून मला तिचा निर्णय अत्यंत योग्य वाटतो. एक स्त्री स्वतःसाठी स्वयंपूर्ण असते. परंतु तिला प्रेमाची आणि भावनिक आधाराची गरज असतेच. जेव्हा ती कटू दुनियेत होरपळून आत्मनिर्भर बनते, तेव्हा ही गरज पण संपून जाते. ती स्त्री समर्थ बनते; बंडखोर नाही. आगीतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्या प्रमाणे अनुपमासुद्धा स्वतःच्या आयुष्याला आकार देण्याइतकी सक्षम होते. तेव्हा प्रेमाची भूक संपून, फक्त स्वप्नांची ओढ लागते. ह्या समाजात अनेक अनुपमा चालीरितींचा वेढ्यामध्ये घुसमटत आहेत, त्यांना मोकळा श्वास घेण्याची आशा लेखिका सुद्धा मूर्ती ह्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांच्या ह्या प्रयत्नाला माझा सलाम.